मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

I'm just being foolishly absurd!

३ डिसेंबर, २००७ · अद्यतन ४ जानेवारी, २०१४

अशीही काही युद्धे खेळावी लागतात,

ज्यात निर्णायक पावलांनी आणि निर्विकार चेहर्‌यानं

पराभव एखाद्या डोंबासारखा उभा असतो

पुढच्याच टप्प्यावर.

आपण प्रॅक्टिकल शहाणपणा इत्यादी दाखवून

साळसूद माघार घ्यायची आहे की

पाठ फिरवण्याचा प्रॅक्टिकल निर्णय घेणार्‌या

आपल्याच सूर्याजी पिसाळांची मानवी मजबुरी क्षमाशीलपणे स्वीकारत,

बेमुर्वतपणे रक्तबंबाळ होत

पुढे घुसून ताठ मानेने मरायचे आहे

इतकाच वाव उरतो निवडीला.

युद्ध जिंकणे वा हरणे अशा वेळी अगदीच बिनमहत्त्वाचे झालेले.

डोळ्यांत उतरलेले गरम लालबुंद आवेगी रक्त

आणि डोक्यात उरलेले

‘मागे फिरायचे नाही-’ इतकेच तुटक वेडसर शब्द.

बाकी सगळे आपल्या जगातले नव्हेच.

अशा वेळी रक्तातला वेडसर मुरारबाजी जिंकतो

की रक्तातच दबा धरून बसलेल्या डार्विनच्या बिलंदर पेशी जिंकतात…

इतकेच पाहायचे खरे तर.

अशा वेळी काय करतात

ते खरे तर मला अजूनही उमगलेले नाही.

जीव वाचवून मुकाट खरीदावेत

शहाण्या रसिकासारखे

पिंजर्‌यातले लव्हबर्डस् इत्यादी

की झाला-न झालेसा

स्वप्नांचा राजवर्खी उदास स्पर्श जपावा

बोटांवरला?

प्रश्न मोठे भाग्याचे…

या असल्या प्रश्नांची उत्तरे देता येणे दूरच राहिले,

असले प्रश्न पाडून घेणेही आचरट आणि आत्मघातकी मानले जाते तुझ्या जगात.

माफ कर मित्रा…

I’m just being foolishly absurd!

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2007/12/im-just-being-foolishly-absurd.html