मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

क्यूँ नये नये से दर्द कि फ़िराक मे तलाश मे...

क्युबिकलमधे हातपाय झाडून त्याला 'एरोबिक्स' म्हणायची सवय लावून घेऊन तसे बरेच दिवस झाले. ते करताना चेहरापण निर्विकार ठेवता येतो आता. भिवया उंचावल्या जात नाहीत आणि फिस्सकन हसायला येणार नाही याचीपण ग्यारण्टी देता येते. जेवायला जाताना अडीच सेंटीमीटरचं स्माइल, 'बाय' म्हणताना दीड…

१० एप्रिल, २००८ · अद्यतन ४ जानेवारी, २०१४

क्युबिकलमधे हातपाय झाडून त्याला ‘एरोबिक्स’ म्हणायची सवय लावून घेऊन तसे बरेच दिवस झाले.

ते करताना चेहरापण निर्विकार ठेवता येतो आता.

भिवया उंचावल्या जात नाहीत आणि फिस्सकन हसायला येणार नाही याचीपण ग्यारण्टी देता येते.

जेवायला जाताना अडीच सेंटीमीटरचं स्माइल, ‘बाय’ म्हणताना दीड सेंटीमीटर पुरे.

येताजाता लोकांना ‘हाय’ न करता ‘ब्लिंक’ केलं तरी चालतं.

आपण बरं, आपलं काम बरं.

एन्जॉय माडी…

असलं स्वतःचंच कौतुक करत करत परवा ‘जेन फोंडा’गिरी पार पाडली.

आणि आपलं नाक दीड फूट उंचावर ठेवून अलिप्तपणे माणसांतून वाट काढत चालायला शिकलो आपण, अशी शाबासकी स्वतःला देण्याच्या बेसावध क्षणीच एरोबिक्स-बाईनं चांगलं साडेपाच सेंटीमीटरचं हास्य माझ्या दिशेनं फेकलं.

काही कळायच्या आत मी माझ्याच खांद्यावरून मागे पाहिलं.

तिथे कुणीसुद्धा नाही, हे कळल्यावर मात्र मी दचकले.

म्हणजे… मला?

का बाई?

मी काय केलंय?

माफ कर…

असे विचार डोक्यात येतात न येतात तोच तिनं मोर्चा माझ्याकडे वळवला. मी कोण-कुठची, मी कित्ती मनापासून व्यायाम करते (हो? असेल बाई..), माझं स्माईल किती गोड आहे (…) वगैरे वगैरे पायर्‍या यथासांग पार पडल्या आणि मग जवळ जवळ रोज बाईंसोबत कॉफी घेणं आलंच.

कॉफी. थोड्या कोरड्या गप्पा. थोडं हसणं. ओळख. मैत्री…?

शिट्…

नाही नाही म्हणताना किती लोकांशी ओळखी झाल्या अशा.

‘ठाणे. प्रमोद महाजन का भाई रहता था वहॉं. पता है?’ या माझ्या प्रश्नाला ‘मुंबई-ठाने. भारत की पहली लोकल ट्रेन. सन अठ्ठारासो तिरपन,’ असं उत्तर देऊन माझी विकेट घेणारा एक बिहारी.

‘भुस्कुटे म्हणजे…’ असं विचारत हेतुपूर्वक थांबून, मी काहीच बोलत नाही म्हटल्यावर नाईलाजानं कावरंबावरं हसून, पुढे ओळख करून घेणारी एक मराठी मुलगी. अर्थात - महाराष्ट्राचा कोस्टल एलिमेण्ट!

‘क्या? अस्सी हजार? तेरे पापा देंगे इतना डिपॉझिट? चल, मैं बात करवाती हूं सस्तेमें…’ असं झापणारी एक दिल्लीकर पोरगी.

दुसर्‍याच रात्री कॅबमधून परतताना अंमळ जास्तच वेळ खिडकीतून चंद्र पाहिला, तर ‘होमसिक झालीयेस?’ असं मराठीतून विचारून मला दचकवणारा एक मराठी कलीग.

या सगळ्यांना निकरानं टाळता टाळता माझ्या जुन्या ऑफीसमधल्या मित्रांशी किती गप्पा मारल्या मी मनातल्या मनात.

माझे सगळे नखरे- सगळी नौटंकी किती सहज चालवून घ्यायचात तुम्ही.

इथे जेवता जेवता तेव्हा खास माझ्यासाठी आणलेल्या खरड्याची चव आठवते आणि जेवण कडू होतं.

आता इथल्या रिकाम्या संध्याकाळच्या गर्भार वेळी बांग ऐकताना त्या सगळ्या जिवंत संध्याकाळींची तलवार टेकलेली राहते गळ्यापाशी.

संध्याकाळ. तिला तरी कशाला बदनाम करावं फक्त?

आठवणींना काय प्रहर असतात?

दोन क्युबिकल्सच्या मधल्या जागेत मला सूर्यनमस्कार घालून दाखवणारा आणि ‘बघू नका फक्त. करा. करा,’ हे वर ऐकवणारा माझा बॉस.

प्रेझेण्टेशनच्या वेळी माझ्या चेहर्‍यावरचं टेन्शन वाचून एका मित्रानं केलेला मेसेज - ‘टेक अ डीप ब्रेथ ऍण्ड से लाउडली - भोसड्यात गेली कंपनी…’

एका आत्यंतिक किचकट प्रॉब्लेमवर काम करावं लागू नये म्हणून माझ्याशी लपाछपी कम् पकडापकडी खेळणारे दोन वेडसर मित्र.

‘का कंटाळलीयेस इतकी? चल, आइसक्रीम खाऊया?’ असं विचारून मला ऑलमोस्ट रडायला लावणारा एक मित्र.

मला साडी नेसलेली पाहिल्यावर हसून गडबडा लोळण्याची ऍक्टिंग करणारा एक मित्र.

शेवटच्या दिवशी मला एकटीला जराही वेळ न देता अखंड बडबड करणारा, जाताना मला घट्ट मिठी मारणारा एक मित्र.

माझं क्युबिकल.

माझा पीसी.

माझी खिडकी.

खाडीचा खारा वारा.

लांबवरचं जिवंत-निवांत शहर.

तिथवर नेणारे ते फिलॉसॉफिकल रूळ…

उफ्फ्…

आता मात्र नाही.

मी मुद्दामहून तुलना करीन दुष्टपणानं यांची त्यांच्याशी.

मुद्दामहून कुचकटपणानं वागीन.

तुसडेपणा करीन.

पण आता नाही. परत नाही.

कष्टानं उभी केलीय सगळी तटबंदी. आता कुणाला इतक्या सहज सुरुंग नाही लावू देणार.

मग कितीही सेंटीमीटर हसा.

पण लांब असा. सुरक्षित अंतर राखून असा…

मेघना भुस्कुटे

काहीबाही

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2008/04/blog-post_10.html