आजच्या संध्याकाळीला भेसूर चेहरा नाही.
नाही. कसलाच तात्पुरता मुखवटाही नाही.
वेळ भरत राहण्याचा, स्वतःपासून पळत राहण्याचा शाप नाही.
दिवस पुरता अर्धमेला झाल्यावरच घराकडे परतण्याचा धाक नाही.
नाही. ही सवयही नाही.
अजुनी संध्याकाळ जिवंत असण्याची संपली नाही माझ्याकरता. म्हणूनच आजच्या संध्याकाळीचं अप्रूप.
सवय? माणसाला कसलीही सवय होते.
घेट्टोमध्ये मरण उद्यावर ढकलत राहण्याची.
मृत नात्यांमध्ये पेंढा भरत राहण्याची.
मरेपर्यंत जगत राहण्याची.
ती सवय. ही सवय नव्हे.
अजून तरी संध्याकाळ म्हणजे अनामिकानं भयभीत होऊन देवाच्या दगडापाशी शरण जाण्याची वेळ झाली नाही माझ्याकरता. म्हणूनच आजच्या संध्याकाळीच अप्रूप.
तश्या संध्याकाळी होत्याच जिवंत माझ्याआत. असल्या-नसल्या सगळ्यासकट अंधारात उडी मारताना. रसरसून पेटून जगताना. वैराण उद्ध्वस्त होत जाताना. गुलाबी फुलांच्या नसतील. धगधगत्या केशरी जाळाच्या असतील. पण जिवंत होत्या. म्हणून तर दर दिवशी त्यांना तोंड देताना थकून जायला होई. वाटे, यातून कधी सुटका होणार की नाही? किती काळ हे असं केसर-जाळाचं आयुष्य? कधीतरी ताकद संपेल. कधीतरी थकून, भिऊन आपण कासवासारखे मिटून घेऊ स्वतःला. एखाद्या संसारी स्त्रीसारखी संध्याकाळीच्या थडग्यावर दिवेलागणीचा दिवा लावून स्वतःची सुटका करून घ्यायला शिकू. कातरवेळ मरून जाईल… निबर होऊ आपण…
तशी आजची संध्याकाळही संपूर्ण जिवंत. पण तिचा चेहरा भेसूर नाही.
माझ्यातली सगळी दमणूक शोषून घेत,
कलत्या उन्हाची जादू पुन्हा बहाल करत,
त्या मऊ प्रकाशाला कोवळे उत्कट सूर पुरवत.
जिवंत पावलांनी, उष्ण-सुखद श्वासांनी,
अंगणात उतरलेली संध्याकाळ.
अपुरेपणाचं भय न दाखवता त्यातल्या जिवंतपणाचं आश्वासन देणारी संध्याकाळ.
अशा निरामय वेळेसाठी कृतज्ञ तरी कुणाचं असायचं असतं?
कदाचित अशा वेळेसाठीच शब्द खोदून गेलेल्या त्या कवीचं.
जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
पहाडामागे वारा अडत नाही,
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
एखाद्याची महायात्रा पाहून एखादा सहजच नमस्कार करतो आहे,
तोवर आम्हांला एकमेकांशी अबोला धरण्याचा अधिकार नाही…
…या आयुष्यात खोल बुडी मारून आलेला एखादा,
सर्वांना पोटाशी धरणारा कुणीतरी,
आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे…