मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

चालली घोडी दिमाखात

११ जून, २०१९

पट्टे आवळा, जिरेटोप बांधा

टाकली टांग, मारली टाच

नवा दिवस, नवी सकाळ

चालली घोडी दिमाखात

याला घाई त्याला घाई

तिला घाई हिला घाई

साईड मुळीच देणार नाही

माझीच सगळ्यांत मोठी आई

सुटेल सिग्नल मिनिटभरात

हाक गड्या, ये पुढ्यात

घुसव चाक, दिसली फट?

सुटला-सुटला, चालव हात

चपळाईने हेर जागा

बघ चौफेर, नजर ठेव

आला आला पार्किँगवाला

सुट्टी नोट तयार ठेव

चल चल पाऊल उचल

दे रेटा मार धक्का

इतकं हळू भागेल कसं?

भीड सोड हो पक्का

पर्स धर पोटापाशी

त्यात तुझे पंचप्राण

लाव जोर, शीर आत

नेम धरून कोपर हाण

एरवी तुलाच बसेल ढुशी

जाईल तोल, पडशील खाली

मिनिटभराची सुकी हळहळ

‘आली कुणी चाकाखाली!’

बंद निसटू देऊ नकोस

अडकेल कुठे, फास बसेल

स्वतःसकट चार जणांत

गोंधळ माजेल, गाडी चुकेल

तोल जाऊन देऊ नकोस

हासड शिवी, झिंज्या धर

पायावरती दे पाय

एरवी कशी येशील वर?

ओलीगच्च एक पाठ

तिला चिकटून एक नाक

शिरलं शिरलं ढुंगण फटीत

मागून बसली एक लाथ

जीव झाला लोळागोळा

अर्धा श्वास राहिला वर

थांब थोडा, सुटेल गाडी

मिळेल हवा, धीर धर

बेंबीपासून खेच श्वास

लाव जमेल तितका जोर

आत घूस, पकड जागा

नाहीपेक्षा बरा डोअर

बसला गचका, सुटली गाडी

झाला तह, रेलली पाठ

नवा दिवस, नवी सकाळ

चालली घोडी दिमाखात

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2019/06/blog-post_11.html