‘लोकसत्ते’च्या गुरुवारच्या ‘रंगतरंग’ पुरवणीत एक सदर असे. एखादं आडवाटेचं सिनेगीत, त्याचं चित्रण आणि सूर, शब्द आणि अभिनय यांबद्दलचं रसग्रहण. जेमतेम दोन-अडीचशे शब्द. एखादा फोटो. त्या सदराची फार आठवण झाली. फारदा. म्हणून.
~
अजून नायक-नायिकेत प्रेमाचा इजहार व्हायचाय. आकर्षणाचा एक दिसे-न दिसेसा धागा तेवढा आहे. पण सुंदर नि तरुण असले, तरी नायक-नायिका तसे सुटवंग नाहीत. नायकावर दिवंगत बहिणीच्या तीन पोरांची जबाबदारी अचानकच येऊन पडलीय. नायिका श्रीमंत बापाकडून पळून नायकाकडे चक्क गव्हर्नेस म्हणून राहिलेली. एखादं वत्सल कुटुंब असावं तसं त्यांचं योगायोगानंच जमून आलेलं युनिट.
गाण्यात हे सगळं दिसत राहतं. पोरांसकट नायक-नायिकेनं केलेली धमाल. पावसात भिजणं. खेळणं. भटकायला जाणं. शेकोटीभोवती गाणी गाणं… आणि त्याच्या पृष्ठभागाशीच दोघांमधलं हे आकर्षण. त्यांच्यातला सेक्शुअल टेन्शनचा अवघडलेपणा, चोरटे कटाक्ष, ते पकडले गेल्यावरचा अवघडलेपणा आणि स्वतःशीच फुटणारं बारीकसं हसू, मनोराज्यं आणि त्या मनोराज्यांच्या फॅण्टसीची जाणीव… हे सगळं या गाण्यात आहे. त्याला खेळकर, हलक्याफुलक्या, मस्तीखोर वातावरणाचं सुरेखसं आवरण आहे.
नुकत्याच एखाद्या मस्त पिकनिकची सुरुवात झाली असावी नि त्या सकाळच्या तासातच पुढच्या मजेची चुणूक जाणवून फुलारून जायला व्हावं तसं हे गाणं. पॅशनचं टोक न गाठणारं. सकाळच्या कोवळ्या उन्हाच्या प्रहरातलं.
https://www.youtube.com/embed/vov0HvFN41M
~
काही गाणी आपल्याला निखळ नॉस्टाल्जियापोटी आवडतात, पण आता चारचौघांत बघायची वेळ आलीच तर लाजल्यासारखं होतं. ‘जाती हूं मैं’ हे तशातलं गाणं. बिछान्यात करायच्या गोष्टी दाखवू शकत नसल्यामुळे त्या जागी गाण्याचा वापर करायचा ही हिंदी सिनेमाची लाडकी ट्रिक त्यातही आहे. पण असल्या इतर गाण्यांपेक्षा हे गाणं चार पावलं पुढेच आहे. तसे त्याचे शब्द प्रामाणिक आहेत. ‘खुद पे नही है भरोसा’, ‘जादू तेरे जिस्म का’, ‘कदम बहक जायेंगे’ वगैरे वगैरे नायक-नायिका दोघंही सुरुवातीपासून सांगत असतात. पण दुर्दैवानं दृश्यांवर मर्यादा असतात. त्यामुळे गाण्याच्या कोरिओग्राफरवर नि कॅमेरामनवर भलतीच मोठी जबाबदारी येऊन पडल्याचं जाणवतं. गुदगुल्या, कढीची पाळ फुटली रे फुटली, शिवाशिवी, कॅच-कॅच, ठो दे रे ठो दे रे, लंगडी इत्यादी खेळांचा त्यांनी फार कल्पक वापर केलाय. पण तरी त्यातल्या नाचाच्या काही स्टेप्स आणि कॅमेर्याच्या पोझिशन्स बघून दचकायला होतं. उदा. २ मिनिटं ११ सेकंदांनी काजोल आडवी झोपते, समोर शारुख. काजोलच्या पायांशी कॅमेरा आणि ती झोपेत आपण गुडघा पोटाशी घेतो तसा घेते, पुन्हा सरळ करते. क्षणभर आपण बिचकतो. आगं, आगं! च दिसेल की! पण तिला प्रेमाचा ताप नीट चढलेला असल्यामुळे तिचं आपलं चालूच. मग कळतं, ओह. ही स्टेप आहे होय नाचाची. ३ मिनिटं १३ सेकंदं. आपण नाकात बोट घालून हळूच बेंचच्या खाली पुसून टाकायचो, तशी एक अॅक्शन शारुख करतो. हे मागे-पुढे करत चांगलं तीनदा पाहिल्यावर कळतं, तो ओठांवर बोट टेकून त्या बोटाची पापी काजोलला देत असतो. ३ मिनिटं २३ सेकंदांनी काजोल शारुखच्या जाकिटात डोकं खुपसते. बरं, खुपसते तर खुपसते. कॅमेर्याचा अॅंगल? तिच्या कमरेपाशी? अं? माणसानं सोसायचं म्हणजे तरी किती? इतक्यानं संपलं नाही. ज्या तबेल्यात हे गाणं घडतं, त्यात ओठांचा एक भला मोठा चंबू डकवलेलं एक होर्डिंग शेवटच्या कडव्यात अवतरतं आणि दोघे त्याच्यासमोर नाचतात. मग शारुख वरून खाली पडतो आणि पालथा पडून फक्त कुल्ले वर करणे, खाली करणे इतकंच करतो. वेळ ४ मिनिटं ४७ सेकंद. राजेश रोशनची ठसकेबाज चाल आणि शारुख-काजोलसारखे जिवंत लोक पडद्यावर असतात, म्हणून का हे आपण सोसलं असेल असं आता मनाशी येतं. पण गाणं मात्र सकाळी ऐकलं की दिवसभर तोंडात राहतंच!
https://www.youtube.com/embed/l7iTcZ__Ejg
~
हे गाणं जाम सुपरडुपर हिट होईल अशी निर्माता-दिग्दर्शकाचा होरा होता म्हणे. पण ‘बडी मुश्किल है’च खूप गाजलं आणि हे बाजूला राहिलं. पण अनेक अर्थांनी जमून आलेलं गाणं आहे हे. एकतर माधुरीचा जामानिमा. हिरवीकंच चुनरी आणि तपकिरी रंगाचा लेहंगा. त्याचा देखणा घेर आणि चुण्या. नि कहर म्हणजे माधुरीचा मुद्राभिनय. ‘हात-पाय-धड इत्यादी गोष्टी नाचात नंतर येतात, खरं नृत्य असतं ते या वीतभर चेहर्यावर’ असं मागे एकदा ऋषी कपूर कुठेसा म्हणून गेलाय, त्याची आठवण येते हा नाच पाहताना. काय विभ्रम उमटतात बाईच्या चेहर्यावर. ‘जोराजोरी’ करणार्या याराचा धटिंगणपणा, लटका नकार, त्या जबरदस्तीबद्दल मनापासून उमटलेला आनंद आणि त्याबद्दलची लाज, पण त्याबरोबरीनं खट्याळ मिश्किली… आणि या भावांना चपखल हस्तमुद्रांची जोड. प्रचंड उर्जा, फेसाळत्या तरुण नदीचा ओघ, बघणार्यावर भूल टाकणारं भावदर्शन. माधुरी या गाण्यात अक्षरशः जादू करते. खरी भारी गोष्ट म्हणजे, या गाण्यात माधुरी आहे, पण ‘बघा बघा, मी नाचत्ये, माझा नाच बघा…’ असा आविर्भाव मात्र तेव्हाच्या तिच्यात जन्मायचा आहे. ते तिच्या नाचात दिसतं. अहं, ती नाचते नेहमीच सुंदर, आत्मविश्वासानंच. पण या नाचात सहजता आहे, अभिनिवेश नाही. या गाण्याच्या हाताळणीतही माधुरी ‘लार्जर दॅन सिनेमा’ होऊन बसलेली दिसत नाही. ती सिनेमाच्या गोष्टीतलं एक समरसून गेलेलं पात्र आहे. तिचा नवरा असलेला दीपक तिजोरी आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा खलनायक शारूख खान, दोघेही या गाण्यात दिसतात. शारूख तर जवळजवळ माधुरीइतकंच फुटेज खातो. पण त्याचा तिरशिंगराव चेहरा नाही लक्ष्यात राहत. लक्ष्यात राहतो तो दीपक तिजोरीभोवती रुंजी घालणार्या माधुरीचा सहज वावर. तोही पठ्ठ्या ‘हो मग, नाचतेच माझी बायको सुंदर! पण तिची राखण करण्यात माझा पुरुषार्थ सामावलेला नाही.’ हे ठाऊक असणार्या माणसासारखा सहज आत्मविश्वासानं वावरतो. त्याच्या आणि माधुरीच्या दोनचारदाच होणार्या मोहक नजरानजरीत या गाण्याचा आत्मा आहे. असं वाटतं, विजेसारख्या लवणार्या नि सगळं पणाला लावून शृंगार उधळणार्या या नृत्यांगनेच्या नृत्याचं सगळं सार्थक या तिनं निवडलेल्या पुरुषाच्या एका नजरेत आहे… बाकी सगळं झूठ.
https://www.youtube.com/embed/ti3-y50DsMk
~
वास्तविक मला ‘अंदाज अपना अपना’चे कढ येत नाहीत, तसंच यातल्या चाली म्हणे ओपीच्या गाण्यांवर डल्ला मारून केल्यात, म्हणून मला फारसा त्रासही होत नाही. ओपी माझ्या नॉस्टाल्जियाचा भाग नाही, पण ‘अंदाज अपना अपना’तली गाणी मात्र आहेत. त्यातल्या सगळ्या गाण्यांना विलक्षण साधासोपा गोडवा आहे, तसाच त्यातल्या सगळ्या पात्रांनाही. या गाण्यात आमीर आणि सलमान या दोघांनाही रवीनाला पटवण्यात रस आहे. पण रवीना आणि करिश्मांनी आपापली टारगेट्स नक्की करून घेतली आहेत! अशा खास फिल्मी गोंधळातलं हे गाणं. त्यातल्या करिश्माची नखं नि ओठ गुलाबी रंगाच्या एकाच छटेनं रंगवलेले बघून थोडं क्रिंज व्हायला होतं, पण तिच्या वळवून घातलेल्या ‘डबल वेण्या’ नि त्यावरच्या लाल रिबिनी, तसंच सलमान खानवर चढायची बाकी असलेली खास सलमानखानी उद्दामपणाची झिलई… हे सगळं क्यूटही वाटतं. गाणं प्रेमिकेला आळवणारं असलं, तरी त्यातला रोमान्स ‘हॉट’ वा व्याकूळ नव्हे. त्यात कमाल खेळकरपणा आहे. लहान मुलांची ढोलकी गळ्यात घेऊन, चिवट्याबावट्या रंगाच्या शर्टात सलमाननं मारलेल्या माकडउड्या, आमीरनं नाइटड्रेसला मॅचिंग घातलेली सांताक्लॉजी टोपी आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांसह त्या टोपीचं टोकही फुलारणं वा मरगळणं, करिश्माच्या तोंडच्या शब्दांवर रवीनानं केलेला लाडिक मूकाभिनय, सिनेमातल्या खलनायकांनीही गाण्याच्या ठेक्यावर धरलेला ताल, आणि करिश्माच्या सगळ्या नृत्यमुद्रांना असलेली शाळकरी निरागसपणाची डूब. या सगळ्यानं ते गाणं अतीव भाबडं आणि गोड होऊन गेलं आहे.
https://www.youtube.com/embed/1H0vtkIiPbM
~
इतका देखणेपणा आवडतो तिचा, तर तिला कॅलेंडरवर छापा, सिनेमात कशाला, हे सोनाली बेंद्रेच्या अभिनयहीन सौंदर्याबद्दलचं माझं मत ‘सरफरोश’नं मला इंचभर मागे घ्यायला लावलं, अशी तिची गोष्टीतली पूरक भूमिका. तिचा तो उतावळा, बडबडा स्वभाव या गाण्यात अचूक दिसतो. पावसाळ्यातलं एस्सेलवर्ल्ड, सोनालीचं लक्ष्य नसताना तिच्याकडे बघून हळूच दिलखेचक हसणारा आमीर, आणि ते न कळल्यानं त्याला हर तऱ्हेनं प्रेमाचे इशारे देणारी बिचारी सोनाली. तिचं हताश होणं, तरी न थकता त्याला मस्का लावायला बघणं, त्याच्या वागण्यातले इशारे जोखून धीटपणे त्याच्या गळ्यात पडणं, आणि सरतेशेवटी त्यानं पत्ते ओपन केल्यावर हातातल्या लाह्या भिरकावून देत भाव न खाता धाडदिशी त्याला मिठी मारणं.. अशा हिंदी सिनेमातल्या शालीन नायिकेसाठी तौबा-तौबा ठरवलेल्या गोष्टी ती करते, तेव्हा ती कमाल चिकणी दिसते. आमीरच्या गालाची पापी एका लहान मुलाकरवी घेववून त्याला स्कॅण्डलाइज् करणारा तिचा खट्याळ नि मग खट्टू चेहरा लक्ष्यात राहतो. ‘होशवालों को’मधला टेक्स्टबुक क्लासिक रोमान्स या गाण्यात नाही. उलट या गाण्यात आमीर स्कार्फमध्ये नाक शिंकरतो, डेलियाचं एक नाजूक फूल चावून खातो, प्रेमिकेनं प्रियकराला मारलेल्या चपराकी बघून प्रेमापासून पळून जाण्याचा आव आणतो… सिनेमाशी फटकून नसलेलं, आपलं स्वतःचं कथानक असलेलं, पात्रांचे स्वभाव अधोरेखित करणारं हे गाणं अजूनही बघावंसं वाटतं खरं.
https://www.youtube.com/embed/TAr-lBZJqtk
~
गाणं सुरू होण्याआधी दोनेक मिनिटं या गाण्याची नांदी चाळीखालच्या नाक्यावरच्या टपरीवर घडताना दिसते. तीत या गाण्याची अर्धी गंमत आहे. वाळलेलाच टॉवेल वाळत घालायला बाल्कनीत येणार असलेल्या नायिकेपासून ते नायिकेनं कठड्यावर वाजवलेल्या ‘धिनकधिन्धा-’ या तबल्याच्या बोलांपर्यंत, आणि नायिकेच्या बापाच्या निरुपद्रवीपणापासून ते नायिकेनं फेकलेल्या फ्लाइंग किसचा झेल नायक कसा ‘अझरसारखा’ पकडेल इथपर्यंत… ही सगळी भविष्यवाणी नाना पाटेकरचं वल्ली असलेलं पात्र टपरीवर बसल्या-बसल्या अचूक वर्तवतं, त्याबरहुकूम सगळं यथासांग घडतं, आणि एखादा क्यू मिळावा, तसे गाण्याचे बोल उमटतात – ‘सर्दी खॉंसी ना मलेरिया हुआ, ये गया यारों इस को, लव्ह लव्ह लव्ह – लव्हेरिया हुआ’! एखाद्या नाटकाच्या कविमनाच्या सूत्रधाराला शोभेलशा भूमिकेत नाना पाटेकर ‘थोडासा रूमानी’त दिसला होता, त्यानंतर यात. मग पुन्हा दिसला, तो थेट सात वर्षांनी ‘हुतुतू’मध्ये. ‘लव्ह, लव्ह, लव्ह’ या शब्दांवर त्यानं केलेली धडधडत्या हृदयाची हस्तमुद्रा डोक्यात घट्ट रुतून राहिली तोवर. गरीब वस्तीत नायक, नायिका आणि त्यांचे आप्त राहत असावेत हे ज्या सिनेमांमध्ये दिसलं, त्या सिनेमांच्या अखेरच्या फळीपैकी हा सिनेमा. पुढे अझीझ मिर्झांच्या सिनेमातले नायकही अधिकाधिक उच्चमध्यमवर्गीय होत गेले. ‘नुक्कड’छाप चाळ आणि बैठ्या घरांची गरीब शहरी वस्ती हिंदी सिनेमातून अंतर्धान पावली. एका सहृदय, गरीब, मुस्लीम चहावाल्यासकट परिपूर्ण अशा त्या वस्तीचे अवशेष या गाण्यात दिसतात. जूहीचा तो पिवळाधम्मक, फुग्याचे हात असलेला प्लेन ब्लाउज आणि तपकिरी रंगांची बारीक नक्षी असलेला घेरदार स्कर्ट यांची त्या काळात फॅशनच आली. शारूख मात्र तत्कालीन स्ट्रगलर नायकांसारखा फॉर्मल शर्टात, हातात ‘इंटर्व्यू’साठीची फाईल घेऊन. पण या वेशभूषांपेक्षाही लक्ष्यात राहिले, ते दोघांचेही कमालीचे फ्रेश, कोवळे, अनाघ्रात चेहरे. त्यांचं कोवळं प्रेम, सगळ्या वस्तीनं त्या प्रेमाचा उत्सव मनवणं, त्यांनी घटकेत लाजणं-घटकेत एकमेकांना बाहुपाशात घेणं-पुन्हा लाजून गोरमोरं होणं.. हे सगळं फार मनोरम होतं. समूहाचा इतका समरसून सहभाग पुढे शारूखचा घट्ट मित्र असलेल्या आशुतोष गोवारीकरच्या ‘लगान’मध्ये दिसला.