खूप सिनेमे आवडतात. सिनेमे खूप आवडतात. पण कधीही कुठूनही मधूनच बघायला घेऊन मज्जाच येईल असे सिनेमे मोजकेच. असे सिनेमे आपल्याला कित्तीही जवळचे असले तरी सिनेमे म्हणून लई भारी असतील, असं नाही. पण आपण त्यांच्यासह वाढलेले असतो, लागेबांधे असतात, त्यांतल्या पात्रांशी जुळलेलं असतं काहीतरी. त्यामुळे ते जवळचे. असे दहाच निवडायचे झाले, तर मी कुठले निवडीन?
विचारही न करता पहिला आठवतो, तो ‘दामिनी’. त्यांतले संवाद मी उलट सुलट पाठ म्हणू शकते, वाकवू-वापरू शकते. भाबडा न्याय असूनही त्यातल्या कितीतरी प्रसंगी थोडंसं भारी वाटतंच. वस्त्रहरणप्रसंगी सभेतल्या दिग्गजांकडे न्याय मागणाऱ्या कृद्ध द्रौपदीची आठवण करून देणाऱ्या न्यायालयातल्या चित्रचौकटी खिळवून ठेवतात. भाव खाऊन जाणाऱ्या मीनाक्षी-सनी यांच्याइतकाच सूक्ष्म, बोलका, जिवंत अभिनय करणाऱ्या ऋषी कपूरचं, कुलभूषण खरबंदांचं, अंजन श्रीवास्तव-सुलभा आर्य-रोहिणी हट्टंगडी यांचं जाम कौतुक वाटतं. आणि मुख्य म्हणजे ठरावीक काळ हा सिनेमा बघून उलटला, की मला त्याची आतून आठवण व्हायला लागते!
तर हा माझा पहिला सिनेमा. दामिनी.
