खूप दिवसांपासून मांजर पाळायचं होतं.
अंगभूत डौल, शिकारी प्राण्याचे गुण. चकित करणारी चपळाई, सावध चाल, तीक्ष्ण नजर, अफाट श्रवणक्षमता, डोक्याएवढ्या लहान सापटीतून सहजी निसटू शकणारं शरीर, धारदार नख्या आणि दात… असं सगळं असलेलं मांजर पाळीव असलं, तरी मिजास राखून असतं. ती त्याची खासियतच. कितीही प्रेमाचं झालं, तरी मालकाच्या मागे लाळ घोटत येणारं मांजर दुर्मीळ. अशा मांजरांचा भोवतालचा वावर सुखावतो, शांतवतो. त्या मोहानं अनेकदा मांजर घरी आणायचे प्रयोग केले. पण त्यांतला एकही यशस्वी झाला नाही. कधी पिल्लाला घरात ठेवायला दारंखिडक्या लावून बसणं जिवावर यायला लागलं. कधी पिल्लाला त्याच्या आईविना चैन पडेना. कधी व्यावहारिक अडचणींपायी मांजराची पाठवणी, तर कधी मांजराच्या मूळ मालकाला विरह सोसेना म्हणून…
एका पिल्लानं तर फार चटका लावला. घरी येऊन चांगला आठवडा झाला, तरी जवळ येऊ देईना. जेमतेम दीड महिन्याचं पोर. पण काय त्याचा फणकारा! फिस्कारणं, पाय आपटून दात विचकून दाखवणं, ओरबाडणं… कुणासमोर अन्नपाण्यालाही तोंड लावायचं नाही. आठवडाभर नाना लाड करून पाहिले. उबेला शाली, खेळायला खेळणी, खाण्यापिण्याचे छप्पन्न प्रकार… त्याला सवय व्हावी म्हणून जमिनीवर बसून बोलाचाली, जेणेकरून त्याला भ्यायला होऊ नये. खाली बसून धीम्या आवाजात वाचणं-बोलणं, संथ हालचालींनिशी वावरणं, आवाज वा पारा चढू न देता त्याला दिलासा देत राहणं… एक ना दोन. पण ते दाद देईना. चिडक्या आवाजात ओरडत राहायचं. शेवटी बहुधा रागानं, अगतिकतेनं, ताणामुळे ते कुठेही हगू-मुतू लागलं. इवलासा मुका जीव. आपल्या हौसेपायी त्याचा सुखाचा जीव दुःखात का घालावा, असा प्रश्न पडला. असहाय वाटायला लागलं. कसेबसे आठ दिवस काढले. पण त्याच्या शीतून रक्त पडायला लागल्यावर मात्र धाबं दणाणलं. त्याला टोपलीत घालून डॉक्टर गाठला.
“हे खूपच आक्रमक स्वभावाचं आहे. वय वाढलं की त्याची ताकद वाढत जाईल. कसं झेपेल तुम्हांला? शक्य असेल तर त्याच्या आईकडे परत सोडाल का त्याला?” असा निस्संदिग्ध सल्ला मिळाला. तो मानला. तशी साहेबांच्या म्यांवचा सूर बदलला. जुन्या ओळखीच्या परिसरात ते बागडू लागलं. येताजाता त्याला कोवळ्या सुरात साद घातली की ते म्यांव करून हाकेला ओ देई. खायला-प्यायला दिलं, तर सावधपणे स्वीकारी. पण त्यापल्याड ओळखीची रेष त्यानं कधीच ओलांडली नाही.
त्याची रोखून बघणारी पण सावध नजर पक्की लक्षात राहिली.
या अनुभवानंतर माझी प्राण्यांकडे बघण्याची नजर बदलून गेली. आपल्याला वाटतं, तशा त्यांना फक्त अन्नाच्याच भुका असतात असं नव्हे. त्यापलीकडे आवडी-निवडी असतात, प्राधान्यक्रम, मूड्स, स्वभाव, भावनिक गरजा, ताणतणाव, आग्रह, हट्ट, त्यातून येणारी दुखणीखुपणी… सगळं असतं. आपण विश्वासाचा पूल बांधायला कमी पडतो – कारण आपल्याला एकमेकांची भाषा अवगत नसते, हे तर झालंच. पण त्याहून खरं म्हणजे, आपली दृष्टी बेपर्वा आणि मानवकेंद्रित असते.
हे चरचरून लक्षात येऊ लागलं, त्या टप्प्यावर लॉरा कोलमनचं ‘द प्यूमा इयर्स’ हे पुस्तक मला मिळालं.
~
